Coronavirus: दिलासादायक राज्यात 2,465 रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णांची संख्या 14, 541 वर
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आय सी एम आर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे.
राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी पुणे संचालक आरोग्य सेवा कार्यालयातील करोना वॉर रुमला भेट दिली. राज्य पातळीवर करोना नियंत्रणाचे काम कशाप्रकारे सुरु आहे, याची माहिती घेतली.