अकोल्यात आणखी 12 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णांची संख्या 52 वर

Thote Shubham
अकोला : अकोल्यात आतापर्यंत संसर्गाची गती मंद असलेल्या कोरोना विषाणूने गत पाच दिवसांत वेग पकडलाय. शहरातील विविध भागात कोरोनानं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आज रविवारी कोरोना विषाणूने बाधीत झालेले आणखी 12 नवे रुग्ण समोर आलेय, यापैकी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

विविध भागातील असलेल्या 12 रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज सकाळी देण्यात आली. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन महिला या दि.१ व दि.२ रोजी मयत झाल्या आहेत. त्या शहरातील बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवासी होत्या.

तर उर्वरित रुग्णांपैकी तिघे मोमीनपुरा, पाच जण बैदपुरा तर दोघे जण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने अर्धशतक गाठले असून, आतापर्यंत ५२ जणांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 34 आहे. कोविड आजारामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एका कोरोनाबाधितानं आत्महत्या केली आहे.

सलग पाच दिवसांपासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान शुक्रवारी चार रुग्ण आढळले होते. शनिवारी आणखी आठ रुग्णांची भर पडली होती. आज रविवारी आणखी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर, तर मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे.

Find Out More:

Related Articles: