हनुमानासारखे पर्वत उचलायचे नाहीत, जयंतीला घरीच थांबा, शब्ब-ए-बारातची प्रार्थनाही घरातच करा - अजित पवार

frame हनुमानासारखे पर्वत उचलायचे नाहीत, जयंतीला घरीच थांबा, शब्ब-ए-बारातची प्रार्थनाही घरातच करा - अजित पवार

Thote Shubham
मुंबई : लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे.

असं सांगत उद्या हनुमान जयंतीला घराबाहेर न पडण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.


‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्य आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.


‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत.

बंदीआदेश जारी केले आहेत. बंदीआदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल. कोरोनाच्या संदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More