१४२ वर्षात कसोटीत कधीही झालं नाही ते रोहितने आज करुन दाखवलं
बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आहे. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या 71 धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले आहे.
भारताच्या दुसऱ्या डावातही सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करताना 149 चेंडूत 127 धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत 10 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. तसेच रोहितने या सामन्यात पहिल्या डावातही शतकी खेळी आहे. त्याने पहिल्या डावात 244 चेंडूत 176 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 23 चौकार आणि 6 षटकार मारले होते.
त्यामुळे एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात प्रत्येकी 6 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा रोहित पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी कोणालाही असा कारनामा करता आला नव्हता.