
अवघ्या ४ लाखात मिळणार स्टॉर्म आर ३ इलेक्ट्रिक कार
पर्यावरण पूरक आणि पेट्रोल डिझेल तसेच सीएनजीपेक्षा चालवायला स्वस्त इलेक्ट्रिक कार जगभरात ग्राहकांचे आकर्षण बनल्या असल्या तरी त्यांच्या किमतींमुळे आजतरी त्या सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत. मात्र मुंबईततील स्टार्ट अप स्टॉर्म मोटर्सने सर्वसामान्य ग्राहकाला सहज परवडेल अशी इलेक्ट्रिक कार स्टॉर्म आर ३ नावाने बाजारात सादर केली आहे. ही कार दिसायला सर्वसामान्य हच बॅक प्रमाणे असली तरी प्रत्यक्षात ती तीनचाकी कार असून तिला पुढच्या बाजूला दोन तर मागे एक चाक आहे.
द बेटर इंडियाच्या अहवालानुसार कंपनीचे सहसंस्थापक प्रतिक गुप्ता आणि जिन-ल्यूक अबजी यांच्या म्हणण्यानुसार हा जगमान्य रिवर्स ट्राइफ प्लॅटफॉर्म आहे आणि भारताच्या गजबजलेल्या शहरांसाठी आदर्श कार ठरेल. ही कार वजनाला हलकी असून फुल चार्जवर २०० किमी अन्तर कापेल. तिचा सर्वाधिक वेग ताशी ८० किमी आहे आणि ती १५ एएमपी प्लगवर तीन ते साडेतीन तासात पूर्ण चार्ज करता येते.
या कार साठी लिथियम आयन बॅटरीचा वापर केला गेला आहे. ही बॅटरी १ लाख किमी प्रवास झाल्यावर बदलावी लागेल मात्र अॅडव्हान्स बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमसह वापरल्यास २ लाख किमी पर्यंत ती वापरता येईल. या कारची किंमत ४ लाख रुपये आहे.
आज बाजारात जगभरातील नामवंत कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार आणत आहेत मात्र त्यांच्या किमती तुलनेने खुपच अधिक आहेत. टाटा टीगोरची किंमत ९.४ लाख, हुंदाई कोना २३.७ लाख, महिंद्राची ई टूओ प्लस ६ लाख तर ए वेरीतो ९.५ लाखात मिळत आहेत.