आता हायटेक होणार मुंबई अग्निशमन दल
मुंबई: गेल्या सात वर्षात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लागलेल्या आगीत एकूण ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत या सात वर्षांत आगीच्या एकूण १३,२२६ घटना घडल्या असून यात १४९८ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दल मुंबईत गगनचुंबी इमारतींना लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कात टाकणार असून एका रोबोटचाही समावेश अग्निशमन दलात करण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आग रोखण्यासाठी केल्यास आगीच्या घटना रोखण्यात मदत होणार असल्यामुळे मुंबईतील २४ विभागांवर स्वतंत्र अग्नी सुरक्षा पालन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. ५२ लोकांचा मृत्यू मुंबईत २०१८मध्ये आग लागल्याने झाला होता. तर ही संख्या घटून २०१९मध्ये २८ एवढी झाली होती.
मोठ्या प्रमाणावर मुंबईत शहर आणि उपनगरांमध्ये इमारतींचे बांधकाम सुरू आहे. विकासकांकडून गगनचुंबी इमारती बांधण्यावर जोर दिला जात आहे. अग्निशमन दलासाठी गगनचुंबी इमारतींना आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे अडचणीचे ठरत आहे. त्यातच आगीच्या घटना पावसाळ्यात वारंवार घडत असतात.
शिवाय पूरस्थिती, लिफ्ट कोसळण्याच्या घटना, नाल्यात पडून होणारे मृत्यू, झाड कोसळणे आदी कामांचा ताणही अग्निशमन दलावरच पडत असल्यामुळे अग्निशमन दलाने हायटेक होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन नवीन फायर ब्रिगेड सेंटर कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेजज आणि कांजूरमार्ग पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर बनविण्यात येणार आहेत.
नुकताच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अग्निशमन दलासाठी यावेळी १०५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आधीपासूनच अग्निशमन दलाच्या मुख्यालयात इंटीग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सिस्टम कार्यरत आहे. तसेच जीपीएस प्रणालीवर आधारीत स्वयंचलित मागोवा प्रणालीही कार्यरत आहे.
अग्निशमन दलात आता डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अग्निशमन दलात आग विझवण्यासाठी रोबोटही तैनात केला जाणार आहे. त्याशिवाय ६४ मीटरहून अधिक उंचीचा टर्न लँडर किंवा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, ५० मीटर उंचीचा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, ड्रोन आणि क्विक रिस्पॉन्स वाहनाचा समावेशही अग्निशमन दलात करण्यात येणार आहे.