सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार-धनंजय मुंडे

Thote Shubham

मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला असून या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी करून आपापल्या घरी जाता येणार आहे.

 

मुंबई शहर व उपनगरात ७ वसतिगृहे असून त्या ठिकाणी ७१ विद्यार्थी थांबलेले आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील अन्य काही वसतिगृहांमध्ये काही विद्यार्थी अडकलेले आहेत.

 

धनंजय मुंडे यांनी या विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

वसतिगृहाचे गृहपाल यांनी संबंधित पोलीस ठाण्यात प्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज केले असून प्रवासाच्या बसचा परवाना आणि चालकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त होताच या विद्यार्थ्यांना विशेष बसने आपापल्या घरी पाठविण्यात येणार आहे.

राज्यात अन्य ठिकाणी वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही याचप्रकारे वैद्यकीय तपासणी करून, रीतसर परवानगी घेऊन आपापल्या घरी जाता येणार असून याबाबत तातडीने आढावा घेऊन कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Find Out More:

Related Articles: