ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड वनडे ला स्टेडियममध्ये एक प्रेक्षक
ऑस्टेलियातील सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात झालेला पहिला वनडे सामना रिकाम्या स्टेडियम मध्ये खेळाला गेला हे खरे असले तरी या स्टेडियम मध्ये एका खुर्चीत एक माणूस बसलेला दिसला. या सामन्याच्या लाईव्ह टेलीकास्ट मध्ये सर्व स्टेडियममधील खुर्च्या रिकाम्या होत्या पण स्कोर बोर्ड खालील एका खुर्चीत एक व्यक्ती दिसली. ही व्यक्ती गेली १२ वर्षे याच खुर्चीत बसून आहे कारण ती जिवंत नाही तर तो आहे क्रिकेटवेड्या स्टीफन हेराल्ड याचा पुतळा.
स्टीफन हेराल्ड गेस्कोजी असे त्याचे पूर्ण नाव आणि लोक त्याला प्रेमाने याबा या नावाने ओळखतात. १८७८ मध्ये सिडने येथेच जन्मलेला याबा जेथे बसून सामना पाहत असे तेथेच त्याचा खुर्चीत बसलेला पुतळा बसविला गेला आहे. पूर्वी या जागी गवत असायचे पण १९९० मध्ये जेव्हा स्टेडियम नव्याने बांधले गेले तेव्हा येथे खुर्च्या बसविल्या गेल्या. २००८ मध्ये याबाचा पुतळा येथे बसविला गेला. पांढरा शर्ट आणि काळी पँट या वेशातील हा पुतळा पुढे वाकून काही कॉमेंट करतो आहे असा भास होतो.
१९ व्या शतकात याबा खरोखरच या जागेवरून काही ना काही कॉमेंट करत असे. तेव्हा क्रिकेट सामन्याच्या वेळी आज टेनिस सामन्यात जशी शांतता असते तशी शांतता असायची. त्यामुळे याबाचा आवाज पूर्ण स्टेडियम मध्ये ऐकू येई. सामन्यादरम्यान एकदम शांत असलेले वातावरण याबाच्या हलक्याफुलक्या कॉमेंट मुळे आनंदी बनत असे. त्याला क्रिकेटची बारीकसारीक माहिती होती त्यामुळे कुणा खेळाडूच्या हातून बारीकशी गफलत झाली की याबा कॉमेंट करत असे. पण त्याने कधीही कुणाला अपशब्द वापरून दुखावले नाही अथवा कुणाचा अपमान केला नाही त्यामुळे त्याची आठवण आजही लोकांना आहे.