
आशिया कपसाठी पाक मध्ये जाणार नाही टीम इंडिया- बीसीसीआय
यंदाच्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे त्याबाबत आमची संमती आहे मात्र हे सामने पाकिस्तानमध्ये खेळविले जाणार असतील तर टीम इंडिया त्यात सहभागी होऊ शकत नाही असा स्पष्ट खुलासा बीसीसीआयने केला आहे. याच वर्षी हे सामने होणार आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आशिया कपचे सामने तटस्थ जागी खेळले जाणे अपेक्षित आहे. मग हे सामने पाक क्रिकेट बोर्डाने आयोजित केले तरी हरकत नाही. मात्र पाकिस्तानात जाऊन हे सामने टीम इंडियाला खेळणे शक्य नही. आशियाई क्रिकेट परिषदेला भारताच्या सहभागाशिवाय हे सामने खेळवायचे असतील तर प्रश्न वेगळा आहे. पण भारताचा सहभाग हवा असेल तर हे सामने अन्यत्र खेळवावे लागतील.
२०१८ मध्ये बीसीसीआयने आशिया कपचे आयोजन केले होते. पण त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाल्यावर हे सामने तटस्थ राष्ट्र युएईमध्ये खेळविले गेले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसे करू शकते. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका टीमच्या बसवर २००९ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यापासून तेथे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही पण नुकताच श्रीलंकेने पाक दौरा केला आहे. भारत पाक मुद्दा अपेक्षा अधिक गहन आहे कारण या दोन्ही देशांचे राजनितीक संबंध तणावपूर्ण आहेत. या पार्श्वभूमीवर टीम इंडिया पाकिस्तान दौरा करू शकत नाही असे हे अधिकारी म्हणाले.