२०१८, २०१९ला सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूला यावर्षी मिळाले केवळ ३ कोटी
आज 2020 आयपीएलसाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलावात आज 338 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. आयपीएल लिलावात मागील दोन वर्षी सर्वात महागडा ठरलेला वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला यावर्षी 3 कोटींची बोली लागली आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने पुन्हा संघात सामील करुन घेतले आहे.
विषेश म्हणजे राजस्थानने 2018 आणि 2019 मध्येही उनाडकटला लिलावात खरेदी केले होते. 2018मध्ये राजस्थानने उनाडकटवर 11.5 कोटीची बोली लावत संघात सामील करुन घेतले होते. तर 2019 आयपीएलसाठी त्यांनी उनाडकटसाठी 8 कोटी 40 लाख रुपये मोजले होते.
आज सुरु असलेल्या 2020 आयपीएलसाठीच्या या लिलावाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्स ठरला आहे. त्याच्यासाठी तब्बल 15 कोटी 50 लाखांची किंमत कोलकाता नाईट रायडर्सने मोजली आहे.
तर ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने 10 कोटी 75 लाखांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे.