जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकवणार राहुल आवारे पहिला महाराष्ट्रीयन

Thote Shubham

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याने वर्ल्ड चॅम्पियनशीप 2019 मध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.  कजाकिस्तान नूर सुलतान या ठिकाणी सुरु असलेल्या जागतिक कुस्तीची स्पर्धेत राहुल आवारेला कांस्यपदक मिळाले आहे. विशेष म्हणजे राहुल आवारे हा जागतिक पदक मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय पैलवान ठरला आहे.

61 किलो पुरूष फ्री स्टाईल स्पर्धेत राहुल आवारेचा सामना  अमेरिकेचा कुस्तीपटू टायलर ली ग्राफ याच्यासोबत झाला. महाराष्ट्रातील बीडचा पैलवान असलेल्या राहुलने टाइलर ली ग्राफचा 11-4 च्या फरकाने पराभव केला आणि कांस्यपदकावर  नाव कोरले.

यामुळे जागतिक चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या नावे चार कांस्यपदक आणि एका रौप्य पदकाची नोंद आहे. या स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू दीपक पूनिया याला अंतिम सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

कॉमनवेल्थ गेममधील सुवर्ण पदक विजेता राहुलने तुर्केमिनिस्तानच्या करिम होजाकोवला 13-2 च्या फरकाने हरवत विजयी सलामी दिली होती. यानंतर उपांत्यपूर्व स्पर्धेदरम्यान कजाकिस्तानच्या रसुल कालियेचा 10-7 ने पराभव करत अंतिम चार मध्ये स्थान मिळवलं. मात्र काल (21 सप्टेंबर) झालेल्या उपांत्य फेरीत राहुलचा जॉर्जियाच्या बेका लोमात्जेने 6-10 ने पराभव झाला आणि त्यामुळे त्याच्या सुवर्ण पदकावर पाणी सोडावे लागले.

दरम्यान कुस्तीच्या जागतिक स्पर्धेत भारत देश पाच पदकांचा मानकरी ठरला आहे. यात विनेश फोगट ही महिलांच्या 53 किलो वजनी गटात कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे. त्यानंतर बजरंग पूनिया 65 किलो वजनी गटात, रवि कुमार 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे. तर दीपक पूनिया याला रौप्य मिळाले असून राहुल आवारेने 61 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे.


Find Out More:

Related Articles: