कुटुंबासोबत वेळ मिळत आहे तो हसत खेळत घालवा; पुढचे १५ ते २० दिवस कसोटीचे - उद्धव ठाकरे
आज बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय धाडसी असल्याचं सांगत जनतेला दुकानांमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आपण पोहोचलो असल्याचं सांगितलं. २४ तासं दुकानं सुरु ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. तुमच्या सर्वांच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही आहे अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “संकटाच्या मागे हात धुवून लागायचं आहे. जीवनाश्यक वस्तूंची दुकान २४ तास सुरु राहणार आहेत हे वारंवार सांगत आहोत. काही ठिकाणी काहीही कारण नसताना झुंबड उडाल्याचं कळालं. आम्ही गर्दी करु नका असं आवाहन वारंवार करत आहोत”. “भाज्यांची वाहतूक सुरु आहे. लक्षात येत आहे त्याप्रमाणे सूचना देत आहोत. शेतीविषयक मजुरांची ये जा थांबता कामा नये. अन्नधान्य पुरवठा करणारी मालवाहतूक थांबवता येणार नाही. ती चालू आहे,” असं उद्दव ठाकरेंनी सांगितलं.