भाजपला मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देणे मान्य नाही

Thote Shubham

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम आरक्षण संविधानाला धरून नसेल तर त्याला आमचा विरोध असेल, अशी भूमिका घेतली असून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस बोलत होते.

 

विधानसभेमध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल मुसलमानांना देखील धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठीचा प्रस्ताव मांडला. तसेच शिवसेनेचा या आरक्षणाला पाठिंबा असल्याचे मलिक यांनी म्हटले. पण आमचा या आरक्षणाला विरोध असल्याचे म्हणत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

 

मुस्लिम आरक्षणाला या अगोदर शिवसेना विरोध करत होती. आता या सरकारमध्ये आल्यानंतर ती त्याला पाठिंबा देत आहे. तर मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देणे आम्हाला मान्य नसल्यामुळे ओबीसी आणि इतर अल्पसंख्याक समाजावर अन्याय होईल, असे म्हटले. तसेच अगोदरच अनेक विषयांवर महाविकास आघाडीच्या या तीन पक्षांमध्ये सेटिंग झाल्याचा आरोप करत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

 

धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. पण, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी आताचे हे राज्य सरकार प्रयत्न करत असल्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. सदनात हा विषय ज्यावेळी येईल त्यावेळी जर हे संविधानाला धरून नसेल तर आमचा विरोध असेल, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. त्याचबरोबर शिवसेनेने आणखी किती विषयात सेटिंग करून सरकार बनविले आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच कॅग अहवाल- सिडको घोटाळा आरोप याबाबत कोणीही काही सांगेल ते ऐकू नका. सभागृहात अहवाल आला की मी बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Find Out More:

Related Articles: