तब्बल 15 जण डिस्चार्जच्या वाटेवर, राजेश टोपेंची महाराष्ट्राला गुड न्यूज

Thote Shubham
मुंबई : राज्यातील 15 कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जगभरात कोरोना थैमान माजवत असताना राज्यातील 15 रुग्ण बरे होत आहेत ही एक समाधानाची बाब असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. कोरोनापासून माणूस बरा होऊ शकतो. फक्त आपण काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

“औरंगाबादमध्ये 1, मुंबईमध्ये 12, पुण्यात 2 अशा एकूण 15 जणांना डस्चार्ज दिला जाऊ शकतो. ही एक समाधानाची बाब आहे. यातून बरे होता येतं. आज 106 अॅडमिट आहेत. त्यातील 2 आयसीयूमध्ये आहेत. तर इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


“राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीबघून संचारबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढची परिस्थितीचा विचार करता मी काल जवळपास दोन ते तीन तास त्याबाबत अवलोकन केलं आहे. एन 95 चे मास्क, आयसोलेशनचे बेड, क्वारंटाईनचे बेड किती आहेत यासंदर्भात आढावा घेतला”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“अनेक कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून मदत करत आहेत. त्यांचं मी आभार मानतो. त्यांना आवाहनही करेल, अशा परिस्थितीत अशाच प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे,” असं राजेश टोपे म्हणाले.

Find Out More:

Related Articles: