दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या हाती मोठे यश
मुंबई – सीबीआयला अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मोठे यश मिळाले असून सीबीआयच्या हाती नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल लागले आहे. सीबीआयने हे पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधून काढले आहे. सीबीआयने हे पिस्तूल नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधून काढल्याची माहिती तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दाभोलकर यांना ऑगस्ट 2013 साली मॉर्निंग वॉकला जात असताना दोन अज्ञात बंदूकधारकांनी गोळ्या घालून ठार केले होते. दाभोलकरांच्या हत्येत खरच ते वापरले गेले आहे की नाही हे शोधण्यासाठी ते पिस्तुल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये एजन्सीने पुणे न्यायालयाला माहिती दिली की ठाण्याजवळील खारेगाव येथे नदीतून शस्त्रे शोधणे आवश्यक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सात जणांची नावे सीबीआयने घेतली आहेत.
नाव न सांगण्याच्या अटीवर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बरेच दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तुल सापडले आहे. बॅलिस्टिक तज्ज्ञ आता दाभोलकर यांच्या पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमध्ये आलेल्या बुलेटच्या आकार आणि प्रकारानुसार याची तपासणी करतील. दुबईस्थित एन्व्हिटेक मरीन कन्सल्टंट्सने पिस्तुल शोधण्यासाठी नॉर्वेहून आपली मशिनरी पाठवली होती.
खारेगावच्या छोट्या नदीच्या प्रदेशाचा शोध घेण्यासाठी तज्ञांनी चुंबकीय स्लेज वापरल्या. केंद्रीय एजन्सीने संपूर्ण ऑपरेशनची व्यवस्था केली. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून पर्यावरणाची मंजुरी मिळण्यापर्यंतची व्यवस्था होती. अगदी नॉर्वे येथून यंत्रसामग्री आणण्यासाठी सुमारे 95 लाखांच्या सीमाशुल्क शुल्कात सूट देण्यात आली. या शोध मोहिमेसाठी सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.