क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे - धनंजय मुंडेंचा
बीड : हिंगणघाट जळतकांडातील पीडितेचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. या तरूणीच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही स्त्रियांवर अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना इशारा दिला आहे. लक्षात ठेवा, क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही अशा इशारा त्यांनी दिला.
धनंजय मुंडे म्हणाले की, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे. क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा.' अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या सात दिवसांपासून पीडिता मृत्यूशी झुंज होती. सोमवारी सकाळी 6.55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालावली. ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय नेत्यांसोबत कलाविश्वातूनही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं जात आहे.