'बिग बॉस' विजेत्या शिव ठाकरेचा मनसेसाठी प्रचार
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे मनसेच्या प्रचारासाठी मैदानात उतरलाआहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी शिव ठाकरे माहिममध्ये आला होता.
संदीप देशपांडे हे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रविवारच्या दिवसाचा मुहूर्त साधत संदीप देशपांडेंनी प्रचाराचा धुरळा उडवला. माहिम आणि दादर परिसरात मनसेने जोरदार प्रचार केला.
एकीकडे ‘बिग बॉस’मध्ये वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चांना तोंड फोडणारा अभिजीत बिचुकले वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना चॅलेंज करत आहे. तर दुसरीकडे ‘बिग बॉस’च्या त्याच पर्वातला ठाकरे आडनावाचा शिव आडनावबंधू अर्थात ‘राज ठाकरे’ यांना पाठिंबा देत आहे.
शिव ठाकरे हा मूळ अमरावतीचा. ‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये सुरुवातीपासूनच शिव ठाकरे याला प्रेक्षकांनी फेवरिट मानलं होतं. ‘रोडीज्’ या रिअॅलिटी शोमधून आलेल्या शिवची सुरुवात काहीशी दबकत झाली. मात्र नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहिला. अभिनेत्री वीणा जगतापसोबत ‘बिग बॉस’च्या घरात त्याचं सूत जुळलं. दोघं लवकरच विवाहगाठ बांधणार असल्याचं सांगतात.
विशेष म्हणजे अभिजीत बिचुकलेशी शिव ठाकरेची गट्टी होती. परंतु बिचुकलेला पाठिंबा न देता शिव मनसे उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिल्याचं दिसत आहे.
शिव ठाकरेसोबतच अभिनेत्री स्मिता तांबे आणि नृत्यांगना फुलवा खामकर यांच्यासह मराठी कलाकार मनसेच्या प्रचारासाठी आले होते. मराठी कलाकारांनी सुरुवातीपासूनच मनसेची पाठराखण केल्याचं पाहायला मिळत होतं. यंदाच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होताना दिसते.