पक्षावर नसून पक्षातील फडणवीसांच्या टीमवर नाराज – एकनाथ खडसे
कन्या रोहिणी खडसे यांच्या पराभवामुळे भाजप नेते एकनाथ खडसे हे नाराज असलेल्या चर्चांना वेग आला आहे. याचप्रमाणे खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पक्षावरील नाराजी खडसे यांनी अनेक वेळा स्पष्ट बोलून दाखवली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा नाराजी बोलून दाखवली आहे. ते नेवासा येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना खडसे म्हणाले, ‘मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षांपासून पक्षाकडून नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या गटाकडून माझ्यावर अन्याय होत आहे, असा आरोप खडसे यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘भाजपवर नाराज नसून पक्षातील फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार आहे, अशी भावना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला होता. ते म्हणाले होते, ‘जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची साथ शिवसेनेला मिळेल असे स्पष्ट संकेत गुलाबराव पाटील यांनी दिले होते.