
उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र पोलिसांसाठी गूड न्यूज
पुणे : आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर ते लगेच कामाला लागले आहेत. पोलिसांना चांगल्याप्रकारचे घरे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यभरातील मुंबई, पुणे, पनवेल सारख्या इतर भागांमध्ये नवे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दिली.
अवघ्या 180 स्क्वेअरफूटच्या घरात पोलीस राहात आहेत. आपला कायदा आणि सुव्यवस्था ते बघतात. 24 तास आपल्यासाठी राबतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला काम करायचे असल्याचे अजित पवार म्हणाले. पैसे मेट्रोच्या कामासाठी दिले गेलेले नाहीत. ते काम गेल्या सरकारने केले नाही. अजून सर्व खात्यांना निधी द्यायचा आहे. कोणत्या खात्याला किती निधी द्यायचा? ते मी बघत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लागणारी रक्कम गृहित धरुन बाकीच्या कामांना कितपत निधी द्यायचा? याबाबत माझे कामकाज सुरु आहे. मी सध्या सर्व विभागांचा आढावा घेत आहे. याविषयावर चर्चा करत आहे आणि अधिकाऱ्यांशी बोलत आहे. अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे? हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.
पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता, 18 आमदार पुणे जिल्ह्यात निवडले जातात. पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात बरीच कामे आहेत. गेल्यावेळी पालकमंत्री असताना जसे कलेक्टर ऑफिस, सर्किट हाऊस, विभागीय कार्यालय केले तशाप्रकारच्या इमारती तालुक्याच्या ठिकाणी बांधायच्या राहिलेल्या असतील तर त्याही पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचा अजित पवार म्हणाले.
माझ्यावरच अर्थ खात्याची जबाबदारी असल्यामुळे संपूर्ण राज्याला विविध कामाकरता उपलब्ध निधीतून पैसे देऊन पुणे जिल्ह्याला कसे पैसे देता येतील? याचा प्रयत्न करेन. यासाठी मी पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.