पवारांनीच आम्हाला प्रेरणा दिली - हेमंत सोरेन
मुंबई झारखंड राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला धक्का देत हेमंत सोरेन यांच्या पक्षाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पवार यांचे आभार मानत आपण पवार यांच्याकडूनच प्रेरणा घेतली असल्याचे हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्यावर या विजयाबद्दल देशभरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. भाजपविरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांनीदेखील सोरेन यांचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सोरेन यांचे अभिनंदन केले. पवार यांच्या अभिनंदनाच्या ट्विटला उत्तर देताना सोरेन यांनी त्यांचे आभार मानले आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्रात केलेल्या संघर्षामुळे आम्हाला झारखंडमध्ये भाजपविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सोरेन यांनी म्हटले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पायउतार व्हावे लागले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.