टीम इंडियाच्या निवड शिबिरासाठी महाराष्ट्राच्या ८ खेळाडूंची निवड
नेपाळ येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी (Kabaddi) पुरुष व महिला संघ पाठवण्यात येणार आहे. यास्पर्धेसाठी भारतीय (Team India) संघाच्या निवड शिबिरासाठी महाराष्ट्रातील ५ पुरुष व ३ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
रोहटक, हरियाना येथे ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान हे निवड शिबिर होणार आहे. त्यातून भारतीय पुरुष व महिला संघ निवडला जाईल.
या शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचा कर्णधार गिरीश एरणक, रिशांक देवाडीगा, तुषार पाटील, विकास काळे व विशाल माने या पाच जणांची पुरुष संघ निवड शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र महिला संघाची कर्णधार सायली केरीपाळे, दीपिका जोसेप व स्नेहल शिंदे यांची महिला संघ निवड शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.
नेपाळ येथे १ डिसेंबर ते १० डिसेंबर २०१९ दरम्यान दक्षिण आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघ २८ नोव्हेंबर २०१९ रोजी दिल्ली येथून रवाना होईल. याबद्द्ल भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून राज्य कबड्डी (AKFI) असोसिएशनला पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.