'हे' आहेत आमचे होणारे उपमुख्यमंत्री, संजय राऊतांनी केले स्पष्ट
मुंबई राज्यात आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे भाष्य करणाऱ्या संजय राऊत यांनी आता पत्रकारांशी बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. या महाराष्ट्र विकास आघाडीच्या उपमुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी वक्तव्य केलं. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लीन चीट मिळाल्याचा आनंदच आहे. आता ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत. अशा आशयाचे वक्तव्य राऊतांनी केलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला होता. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या राज्यात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला. यानंतर यांच्या सोबत शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आले. यामध्ये 22-13-12 चा नवा फॉर्म्युला महाराष्ट्राला पाहायला मिळाला. मात्र या सर्वात जास्त चर्चा सुरु होती ती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्र कुणाच्या हातात येणार याची, मात्र आता संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यामधून सर्व स्पष्ट केले आहे.