
देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ,अजित पवार उपमुख्यमंत्री; नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
मुंबई - महाराष्ट्रात शनिवारी सकाळी मोठा राजकीय उपटफेर झाला. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 9 नोव्हेंबरला महाराष्ट्रात लागलेली राष्ट्रपती राजवट शनिवारी सकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी हटवण्यात आली.
त्यानंतर सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. आता 12:30 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्याची गरज होती, यासाठी मी अजित पवारांचे अभिनंदन करतो आणि त्याचे आभार मानतो की, त्यांनी हा निर्णय घेतला. राज्यपालांकडे आम्ही सरकारच निर्मितीचा दावा केला आणि त्यानंतर राज्यपालांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला शपथ घेण्यासाठी आमंत्रण दिले.
मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आभारी आहे कि, त्यांनी आम्हाला पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी दिली. सध्या शेतकऱ्यांची समस्या सर्वात मोठी आहे. महाराष्ट्राच्या हिताकरिता हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. राज्यपाल आम्हाला वेळ देतील त्यावेळेत आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू. त्यानंतर योग्यवेळी मंत्रिमंडळाची स्थापनाही होईल."
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले, "आजपर्यंत कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही, महाराष्ट्राला शेतकरी प्रश्नांसह अनेक अडचणींचा सामना करावा लागला, म्हणून आम्ही एक स्थिर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे."
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, 'फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या शुभेच्छा. दोघेही महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी मन लावून काम करतील असा मला विश्वास आहे."