मुनगंटीवारांकडूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय ही गोड बातमी मिळेल : संजय राऊत
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा ही शेतकऱ्यांसह सर्वांची इच्छा आहे. भाजपचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गेल्या काही दिवसांपासून लवकरच गोड बातमी मिळेल असे सांगत आहे. बहुतेक ही गोड बातमी त्यांच्याकडूनच तुम्हाला कळेल की, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय,” असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले. “काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते, भाजप नेते विनोद तावडे, रामदास आठवले यांच्यासह अनेकजण राज्यपालांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासह त्यांना कोणीही भेटू शकते.”
“भाजपचे सरकार येऊ नये असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे. तसेच काँग्रेसच्या काही तरुण आमदारांनीही हिच भावना मला कळवली आहे. काँग्रेसच्या आमदारांच्या मागण्यांचे मी कौतुक करतो. शिवसेनेचे सरकार यावं यासाठी मी त्यांचे स्वागत आणि कौतुक करतो,” असेही ते काँग्रेसबद्दल म्हणाले.
हमारे भी दरवाजे खिडकीयां खुली है, लेकिन हम नही चाहते है के कोई मच्छर अंदर आयें…असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे नवनिर्वाचित आमदारांना उद्धव ठाकरेंकडून मार्गदर्शन होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाही,” असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.