ज्यांच्यामुळे आयुष्य संपविले, त्यांना संपवून जा – राज ठाकरे
औरंगाबाद : शेतकऱ्यांना ज्यांच्यामुळे आत्महत्या करावी लागते, त्यांना संपवून जावे, असे म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपचा टी शर्ट घालून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
औरंगाबादमधील वैजापूर विधानसभा मतदारसंघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विरोधकांवर जोरदार तोफ डागली. यावेळी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरुन राज ठाकरे चांगलेच संतापले.
राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी काही तास आधी एक तरुण शेतकऱ्याने भाजपचा टी-शर्ट घालून आत्महत्या केली. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. जो जन्म मिळाला तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांसाठी घालवण्याऐवजी महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांवर गळ्याला फास लावून आयुष्य संपवण्याची वेळ येते.
सत्तेत बसलेल्या या नादानांमुळे शेतकऱ्यांना आपले आयुष्य संपवावे लागत आहे. जर आयुष्य संपवायचंच असेल, तर ज्याच्यामुळे संपवावें लागत आहे, त्याला संपवून जा. चुकीच्या लोकांना निवडून देऊन 5 वर्षे पश्चाताप करण्यापेक्षा योग्य उमेदवाराला निवडून द्या, असेंही आवाहन त्यांनी केले.
मी विनोद करायला किंवा कोणावर टिका करायला आलो नाही. मी सशक्त विरोधक म्हणून निवडणुका लढवतो आहे. राज्यकर्त्यांना जाब विचारा. तुमच्या पिकास भाव नाही. तुम्हालाच सत्ताधारी भाव देत नाही. अशावेळी राग व्यक्त करा, चिड व्यक्त करा.
मुलभुत प्रश्न रखडले आहेत. संपूर्ण देशात मंदीची लाट आहे आणि अमित शहा कलम 370 वर मते मागत आहेत. जे केले ते चांगल झाले, पण पुढं काय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मला काम करण्याचे आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारांना संधी द्या, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले.