मागील 5 महिन्यात उदयनराजेंच्या संपत्तीत झाली एवढी वाढ

Thote Shubham
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या 21 तारखेला राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे आणि त्याचे निकाल 24 तारखेला जाहीर होतील. या 288 विधानसभेसोबतच राज्यातील लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणू्क देखील होत आहे. जितके लक्ष संपूर्ण राज्यातील विधानसभा निवडणुकीवर आहे तितकेच लक्ष साताऱ्यात होणाऱ्या या पोटनिवडणुकीवर आहे.

ही लढत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये आलेले छत्रपती उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी होणार आहे. उदयनराजे यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल करताना त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतनंतर अवघ्या 5 महिन्यात उदयनराजेंच्या संपत्तीत दीड कोटींनी वाढ झाली आहे.

उदयनराजे यांची एकूण मालमत्ता 13 कोटी 81 लाखावरून 14 कोटी 44 लाखांवर पोहोचली आहे. त्यांच्याकडे 40 किलोचे दागदागिने देखील आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार उदयनराजेंकडे ऑडी, मर्सिडिज बेन्झ, इण्डेवर अशा गाड्या देखील आहेत. याशिवाय 185 कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यातून त्यांना उत्तन्न देखील मिळते.

उदयनराजेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांचा व्यवसाय सुखवस्तू असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्यावर एक कोटी 82 लाखांचे वाहन कर्ज देखील आहे. एकूण 23 गुन्हे राजेंवर दाखल आहेत. त्यामध्ये खंडणी, कट रचून खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळे आणणे अशांचा समावेश आहे. याशिवाय सत्र न्यायालयाने त्यांची शरद लेवे खून प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. पण या निर्णयाच्या विरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

उदयनराजेंच्या विरुद्ध निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे देखील श्रीमंत आहेत. पाटील यांच्याकडे 10 कोटींची जंगम संपत्ती तर 11 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पाटील यांनी मुंबईतील वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण सोसायटीला 60 लाखांचे कर्ज दिल्याचे म्हटले आहे.


Find Out More:

Related Articles: