लोकांसाठी आम्ही लढत राहूच!, तुम्हाला हवे तेवढे खटले लावा- शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान आज पारनेर इथे सभेला संबोधित केले. या विधानसभा निवडणुकीला प्रचंड महत्त्व आहे. या सरकारने समाजातील कोणत्याच घटकाच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही. त्यांना मान-सन्मान दिला नाही. त्यामुळे आता परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.
या भागाच्या नशिबी कायम दुष्काळ राहिला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ५-१० टक्के भाग सोडला तर इथे पाणी नाही. त्यामुळे निलेश लंके यांनी सर्वात आधी या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची शपथ घेतली आहे. या संकल्पात आम्ही त्यांना साथ देऊ, आश्वासन शरद पवार यांनी दिले.
शरद पवार म्हणाले, आज शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. भाजपा-सेना सरकारमधील लोकांना शेतीतील प्रश्नांची जाण नाही. त्यासाठी आपल्याला आता निर्णय घ्यायचा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, आम्ही सरसकट कर्जमाफी करू. मात्र अजून कुणालाही कर्जमाफी मिळालेली नाही. आघाडी सरकारच्या काळात अशी परिस्थिती उद्भवली असता आम्ही चर्चा करत बसलो नाही, थेट ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली.
विधिमंडळात कर्जमाफीबबात एका आमदारांनी प्रश्न विचारला असता ३१% शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, असे उत्तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिले. अशी हे शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणार? म्हणूनच आपल्याला परिवर्तन करायचे आहे. जो शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतो त्यांना मत देणार नाही अशी भूमिका आपण घ्यायला हवी.
रांजणगावात औद्योगिक वसाहतीची निर्मिती आघाडी सरकारने केली. या भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी विविध ठिकाणी उद्योगांना चालना दिली. मात्र या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले तसेच तरूणांचेही नुकसान केलेय.
आज मोठमोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. तरूण बेरोजगार होत आहेत. पारनेरच्या औद्योगिक वसाहतीतले उद्योगही बंद पडत आहेत. मग हे सरकार काय कामाचे असा प्रश्न पडतोय. हे सरकार कुणासाठी काम करतंय?, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
सरकारच्या मनात आले आणि नोटाबंदी केली. एटीमच्या रांगेत उभे राहून १०० लोकांचे जीव गेले, नोटाबंदीने झाले काय? काळापैसा गेला कुठे? ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांना आधीच हे माहिती होते त्यामुळे त्यांनी आधीच काय तो उद्योग करून घेतला. आणि नोटाबंदीचा फटका मात्र बसला सामान्य माणसांना.
निलेश लंके यांच्याकडून समजले की, जबरदस्ती कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. सरकार दबावतंत्राचा वापर करत आहे. माझ्याबाबतीतही सरकारने हे करायचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्रातील लोकांसाठी आम्ही लढत राहूच. तुम्हाला हवे तेवढे खटले लावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.