माझ्या रॅलीत कोणाला उचलून आणलेले नाही
माझ्या रॅलीत प्रत्येक जणाने मला प्रतिसाद दिला. अजित पवार खासदार, आमदार झाल्यानंतर जन्म झालेल्या युवकांनीही मला प्रतिसाद दिला. महत्त्वाचे म्हणजे रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाला विचारले असते तर त्यांनी सांगितले असते अजित पवारांचा अर्ज भरण्यास आलो आहे, असेच सांगतील, त्यांना कोणी उचलून आणलेले नाही, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद करीत चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला.
बारामती विधानसभा मतदारसंघासाठी महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी बारामती शहरात भव्य रॅलीद्वारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
शहरातील कसबा येथील शिवाजी उद्यानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर गुणवडी चौक-महावीर पेठ, गांधी चौक-सुभाष चौक-भिगवण चौक-सिनेमा रोड-इंदापूर चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नवीन प्रशासकीय भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, सतीश काकडे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारली याचे मलाही आश्चर्य वाटले. अर्थात हा त्या पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्यावर अधिक बोलत नाही, कदाचित त्यांच्यावर वेगळी जबाबदारी सोपविली जाइल, असे वाटते. मीही या निर्णयाने बुचकळ्यात पडल्याचे त्यांनी कबूल केले. अमित शहा व चंद्रकांत पाटील यांचा हा अधिकार आहे.