
‘माझ्या जागी दुसरा माणूस असता, तर आत्महत्या केली असती’ - शिवाजी कर्डिले
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने 125 उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत.अनेक आयारामांना संधी दिल्याने भाजपसह सर्वच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर तिकीट ज्यांना मिळाले त्यांचा आनंद आता गगनात मावेना अशी स्थिती झाली आहे.
तिकीट कापले जाणार अशी चर्चा असणाऱ्या भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. लोक हात पाहून भविष्य सांगतात, मात्र मी लोकांचे चेहरे पाहून सांगतो, एक लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला. आतापर्यंतच्या सहा निवडणुकीपैकी ही निवडणूक सर्वात सोपी असल्याचं कर्डिले म्हणाले.
कर्डिले पुढे म्हणाले आतापर्यंत अनेक अडचणी आल्या, मात्र माझा परमेश्वरावर विश्वास आहे. मी कधी देवाकडे आमदार खासदार होण्यासाठी काही मागत नाही, तर चांगले झालं नाही तर कोणाचं वाईट होऊ देऊ नको, असा आशीर्वाद मी मागत असतो, असं कर्डिलेंनी सांगितले.माझ्या जागी दुसरा माणूस असता, तर आत्महत्या केली असती, अशी भावनिक प्रतिक्रिया कर्डिले यांनी दिली.