शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही. मी पवारांवर कधीही वैयक्तिक आरोप केले नाहीत. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पवार यांचे समर्थन केले.
एका वृत्तवाहिनीला शेट्टी यांनी नुकतीच मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जे खरच दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी मी ईडी ला भेटलो. याचिका दाखल केली.
यामध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत. बँकांच्या संचालक मंडळाने कोणतीही चौकशी न करता लोकांना कर्ज दिले आणि ज्यांच्या आशिर्वादाने कर्ज दिले त्यातील अनेक लोक भाजपमध्ये आहेत, असेही ते म्हणाले.
या प्रकरणाचा भाजपा आणि सरकार आपल्या सोयीने वापर करून घेत आहे. संचालकांनी हे पैसे त्यांनी स्वतः वापरले नाहीत. कर्ज देताना अनियमितता झाली. विजयसिंह मोहिते यांनी रिकाम्या साखर कारखान्यांच्या जागेवर कर्ज घेतले.
दिलीप सोपलांच्या साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस आली. मात्र जप्तीच्या आधीच सरकारच्या परवानगीने कारखान्याच्या भोवतालची सगळी जमीन विकून टाकली, असे आरोपही शेट्टी यांनी केले.
मात्र, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिखर बँक घोटाळा, साखर कारखाना विक्री व्यवहार घोटाळा, बेकायदेशीर कर्ज प्रकरण घोटाळ्याची पहिली तक्रार शेट्टी यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षत घेऊन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याशिवाय अजित पवार, दिलीप देशमुख, मधुकराव चव्हाण ते नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांची अनेक उदाहरणेही दिली.