पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही, मी स्वतः साक्षीदार - जितेंद्र आव्हाड
बीड जिल्ह्याच्या राजकारणाला काका-पुतण्यांच्या वादाचा इतिहास आहे. यावेळी पुन्हा एकदा मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात हा वाद समोर आलाय. त्यांच्याविरोधात पुतण्याच विधानसभा निवडणुकीत उभा राहणार आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचंही घर फोडलं आणि आता क्षीरसागरांचंही घर फोडल्याचा आरोप केला जातोय. पण या आरोपांवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. आपण स्वतः सर्व गोष्टींचा साक्षीदार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
“इतिहासाचा विपर्यास कुणीही करु नये. मी स्वतः साक्षीदार आहे सर्व गोष्टींचा. पवार साहेबांना सतत लक्ष्य केलं जातंय. बदामराव पंडित आणि धनंजय मुंडे यांच्यात सुरुवातीच्या काळात बैठका झाल्या. प्रत्येक वेळी पवार साहेबांनी अनेकदा सांगितलं की तुम्ही पक्ष सोडून नका, घर सोडू नका, मतभेद मिटवून टाका, प्रश्न संपवून टाका… पण त्यांचे मतभेद टोकाला होते.
कोणताही माणूस एक-दोन वेळा समजावून सांगू शकतो. मी स्वतः सांगितलं, पण ते म्हणाले हे आपलं काम नाही. बदामराव पंडित आणि धनंजय मुंडे यांच्यात जे निर्णय झाले, त्यावर पवार साहेबांनी फक्त शिक्कामोर्तब केलं,” असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.