वंचितचे दरवाजे एमआयएमसाठी अजूनही खुलेच : प्रकाश आंबेडकर

Thote Shubham

जागावाटपाच्या मुद्यावरून ताटातूट झालेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये पुन्हा आघाडी होऊन दोघेही विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची शक्यता बळावत चालली आहे. वंचित बहुजन आघाडीशी पुन्हा चर्चा करण्याची तयारी एमआयएमने दाखवल्यानंतर एमआयएमसाठी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असे मोठे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

गुरूवारी मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये ते बोलत होते.ईव्हीएमसंदर्भात आम्ही कोर्टात जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. निवडणूक आयोग पळपुटे धोरण घेत आहे. अनेक निवडणूक आयोगाचे अधिकारी जेलमध्ये जातील, असे त्यांनी सांगितले. तसंच, ईव्हीएम मशीन हॅक होते हे आम्ही कोर्टात सिद्ध करणार आहोत.

तर ईव्हीएम मशीन हॅक होत नाही असं निवडणूक आयोगाने कोर्टात सिद्ध करुन दाखवाने असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मुस्लिम समाजाच्या 25 उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. विधानसभेला आम्ही मनसेसोबत जाऊ शकत नाही. मराठी माणसाबाबतची मनसेची भूमिका आम्हाला पटत नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने फक्त 8 जागा देऊ केल्या होत्या, असे सांगत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची एकतर्फी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनीच वंचित बहुजन आघाडीशी आम्ही पुन्हा युती करण्यास उत्सुक आहोत. एमआयएमचे प्रमुख असदोद्दिन ओवेसी जागावाटपाबाबत प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करण्यास तयार आहेत, असे संकेत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना इम्तियाज जलील यांनी दिले होते.

या एकूणच प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला. वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला 8 जागांचा प्रस्ताव दिलाच नव्हता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. एमआयएमसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरु असतानाच त्यांनी अचानक युती होणार नसल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीसोबत न येण्याच्या निर्णय त्यांचा आहे. मात्र आमचे दार त्यांच्यासाठी अजूनही खुले आहे, असे आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी या दोन्ही नेत्यांची वक्तव्य पुन्हा एकत्र येण्याच्या दृष्टीने सकारात्मक असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात आघाडी होण्याची शक्यता बळावली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन यात्रेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोक बदलाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीत आता कोणी शिल्लक राहिलेले नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचित आघाडीकडे विरोधी पक्ष नेते पद असेल, असे देखील आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले.

Find Out More:

Related Articles: