भाजप सरकारकडून लोकशाही घालवण्याचे काम होत आहे : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड येथे झालेल्या सभेत उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान, त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. भाजप सरकारकडून लोकशाही घालवण्याचे काम होत आहे. आज पंतप्रधान मोदी नाशिक मध्ये आहेत.
पण विरोधी पक्षातील लोकांना घराबाहेर पडल्यास अटक करू, अश्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. शासनाने आदेश काढले की, मोदी नाशिकमधून जाईपर्यंत कांदा बाजारात आणायचा नाही. यांना कांद्याचीही भीती वाटते, असे पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, देशात मोठी आर्थिक मंदी आल्याचे चित्र आहे. ही मंदी कायम राहिली तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. गुंतवणुकीची समीकरणं बिघडली आहेत. पंतप्रधान मोदी सांगतात की, इतके नवे कारखाने देशात आले पण किती आले यापेक्षा कारखाने बंद झाले याची आकडेवारी मोदींनी जाहीर करावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
आज देशात लाखो तरुण बेकार आहेत. नाशिकमध्ये अनेक कारखाने असतानाही आर्थिक मंदीमुळे ५४ कारखाने बंद पडले आणि १६ हजार तरूण बेरोजगार झाले. आधीच बेकारी त्यात ज्यांच्या हाती काम आहे त्यांना बोरोजगारीला सामोरं जावं लागतंय. यामुळे आज तरूणांची लग्न जमणे कठीण झालेय, याबाबत सरकार काय करतंय? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला.
राज्यात इतके प्रश्न असतानाही मते मागण्याचे काम हे सरकार करत आहे. हाताला किती काम दिले, किती शेतकऱ्यांना वाचवले, शेतकऱ्यांचा किती फायदा काय केला, समाजात एकजुट निर्माण करण्यासाठी काय केलं, पाते आधी सांगा. पण यावर हे सत्ताधारी काहीच बोलत नाहीत.
आज पक्षबदल केलेले माझ्यावर टीका करत आहे. ते म्हणतात, आम्ही विकास करण्यासाठी पक्षांतर करतोय. मग १५ वर्षे सत्तेत असताना आणि मंत्रीपद तुमच्याकडे असताना नेमकं तुम्ही काय केलं? तुमच्या हाती सत्ता दिली तरी तुम्हाला दोन पावले टाकता आली नाही, असे फटकारे शरद पवारांनी ओढले.