कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जातात, पूरग्रस्तांसाठी मदत का नाही?- कोल्हे

दारव्हा दिग्रज: शिवस्वराज्य य़ात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील दारव्हा दिग्रज येथील सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जातात, मात्र सरकार पूरग्रस्तांना मदत करत नाही, अशी टिका कोल्हे यांनी केली.

पूरग्रस्त भागातून शिवसेनेचे १० आमदार निवडून आले. पण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागात पाहणीसाठी गेलेच नाहीत. यावरून सत्ताधाऱ्यांची जनतेशी बांधिलकी उरलेली नाही, हे दिसून येते. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जातात, मात्र सरकार पूरग्रस्तांना मदत करत नाही, अशा शब्दात खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी फडणवीस सरकारवर टीका केली.

सरकारला जमतं ते फक्त खालच्या पातळीचं राजकारण. निवडणूक आली की देशभक्तीचा गाजावाजा करतात. परंतु, या देशाचा प्रत्यक नागरिकाच्या मनात देशभक्ती आहे हे विसरू नका, असे कोल्हे म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील फडणवीस सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढले. राज्य सरकार अत्यंत निष्क्रिय आहे. महापूर ओसरला तरी सरकारला अजून जनतेला सावरता आले नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे भीक मागून मदत गोळा करत होते. राज्यकर्ते असे भीक मागणारे असतात का? अशी खरमरीत टीका पवार यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रात अंमली पदार्थाचे सेवन प्रचंड वाढले आहे. उडता पंजाब या चित्रपटात पंजाबची भीषण परिस्थिती मांडली गेली. महाराष्ट्राची अवस्थाही अशीच बिकट होताना दिसत आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र करून ठेवला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा सत्ता मिळाली. फडणवीस यांना राज्यात पाच वर्षे सत्ता उपभोगता आली. मात्र, ज्या विकासाचे आश्वासन दिले होते तो विकास काही झालाच नाही. विकास जन्माला आला नाही पण मंदी मात्र जन्माला आली, अशी बोचरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

भाजपाने पुलवामा मधील शहीद जवानांच्या नावावर मते मागितली. देशातील तरुणांनीही मोदी है तो मुमकीन है. असं म्हणत प्रतिसाद दिला. मात्र, आज तरुणांना रोजगार नाही, उद्योगधंदे बंद होत आहेत, अशा परिस्थितीतही मोदी है तो मुमकीन है, असं तरुण म्हणतील का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

आज शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवले आहे, या सगळ्याला हे सरकार जबाबदार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.


Find Out More:

Related Articles: