राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची दडपशाही : बाळासाहेब थोरात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रीत करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शाह यांच्या हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेचं राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना आ. थोरात म्हणाले की, राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही मोदी, शाह यांनी सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे. मोदी, शाह ही जोडी लोकशाहीला हरताळ फासून हुकुमशाही पद्धतीने देश चालवत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणा-या प्रत्येकाच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांच्या चौकश्या लावल्या जात आहेत.

वरिष्ठ काँग्रसे नेते पी. चिदंबरम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना ही अशाच प्रकारे त्रास देण्यात येत आहे. देशभरातील विरोधी पक्षाचे जे नेते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवतात त्यांना अशा प्रकारच्या नोटीसा देऊन त्रास दिला जात आहे. मोदी शाह, जोडी संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सरकार विरोधात बोलणा-यांना ईडीच्या नोटीसा पाठवायच्या, देशद्रोही ठरवायचे हाच मोदी शाह यांचा न्यू इंडिया आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

दरम्यान राज ठाकरे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात टाकले जात आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चाल आहे अशी प्रतिक्रिया मनसेकडून दिली जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर असल्याची टीका केली आहे, सत्ताधारी भाजप सूडबुद्धीने वागत आहे, जो तुमची प्रकरणे बाहेर काढेल, जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.

Find Out More:

Related Articles: