उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा 21 आणि 22 ऑगस्टला पूरग्रस्त भागाचा दौरा
सांगली, कोल्हापूर येथील पूर परिस्थिती आता निवळत आहे. मदतकार्य जोरदार चालू आहे, मदतीचा ओघ सुरु आहे. राज्यातील महत्वाच्या पक्षांनी पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत जाहीर केली आहे. अनेक नेते मंडळी या पूरग्रस्त परिसराची पाहणी करून गेले आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 21 आणि 22 ऑगस्टला कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांसह हा दौरा करणार आहेत.
महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहून शिवसेना पक्षाने आपले राजकीय कार्यक्रम रद्द केल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. उद्धव ठाकरे यांना जरी पूरग्रस्त परिसराला भेट देण्यासाठी उशीर झाला असला तरी, शिवसेनेचे आमदार आणि शिवसैनिक यांनी पूरस्थिती असलेल्या पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करण्यात आले होते. आता उद्धव ठाकरे बुधवार आणि गुरुवारी या परिसराचा दौरा करणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही असणार आहेत.
दरम्यान, पूरग्रस्त भागातील लोकांना मदतीचा हात म्हणून, शिवसेनेचे सर्व आमदार व मंत्री यांनी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांच्या संपर्कात असून ते पूरग्रस्त नागरिकांना मदत करत आहेत अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली होती.