पुण्यातून शिवसेनेला कोणते मतदारसंघ मिळणार?

पुणे  – विधानसभेसाठी युती होणार, हे स्पष्ट असले तरी कोणते मतदारसंघ शिवसेनेला सोडणार, हे भाजपने स्पष्ट केलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.            

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युती आणि जागावाटपावर नुकतेच भाष्य केले. त्यावेळी त्यांनी ” निवडणुकीत युती होणार आहे. विद्यमान आमदारांचे मतदारसंघ बदलण्यात येणार नाहीत. उर्वरित मतदार संघ निम्मे वाटून घेण्यात येतील,’ असे स्पष्ट केले. हा फॉर्म्युला मान्य केला, तर पुण्यात सध्या आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे सध्या शिवसेनेला संधी मिळेल, अशी शक्‍यता कमी आहे. तर, शहरातील प्रत्येक आमदार “विधानसभा मीच लढविणार’ असे स्पष्ट सांगत आहे.

याबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केली असता, “आम्हाला याबाबत फारशी कल्पना नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले. पण, युती होणार असली, तर जुन्या फॉर्म्युल्याप्रमाणे कोथरुड, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि हडपसर हे चार मतदारसंघ शिवसेनेला सोडले पाहिजेत, तशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.              

भाजपचे विद्यमान आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील सध्या काहीही सांगण्यास तयार नाहीत. “पक्ष ठरवेल, तो निर्णय मान्य आहे’ अशीच भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे युती होणार असली, तरी मतदार संघाचे वाटप होत नाही तोपर्यंत पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढत राहणार हे निश्‍चित आहे.

Find Out More:

Related Articles: