‘त्या’ वादग्रस्त फोटोवर निलेश साबळेचा माफीनामा
राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात लोकप्रिय असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या प्रकाराबद्दल सोशल मीडियाद्वारे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी यांनी निषेध व्यक्त केला होता. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या निषेधानंतर या कार्यक्रमाविरोधात अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आता कार्यक्रमाचा सुत्रसंचालक निलेश साबळे याने या प्रकरणाबाबत व्हिडिओ शेअर करुन माफी मागितली आहे.
झी मराठीची अधिकृत फेसबुक पेजच्या माध्यमातून निलेश साबळेने एक व्हिडिओ पोस्ट केला. त्याने यामध्ये या प्रकरणाचे स्पष्टीकरण देत आमचा कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. ही एक तांत्रिक चुक होती. आम्ही सर्वांचा आदर करतो. यापुढेही करत राहू, असे म्हटले आहे. वाद ज्या फोटोवरून झाला ते स्कीट वेगळ्या अर्थाने वेगळ्या कारणासाठी दाखवण्यात आले होते. पण त्यामुळे गैरसमज निर्माण झाला. आम्हाला देशातील सर्वच महान व्यक्तींबद्दल आदर असल्याचे म्हणत निलेश साबळेने दिलगिरी व्यक्त केली.