‘धोनीने संघाबाहेर काढण्यापूर्वी सन्मानाने निवृत्ती घ्यावी’ - सुनील गावसकर
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. त्याच्या निवृत्तीबद्दल अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विविध मते मांडली आहेत. आता भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी म्हटले आहे की धोनीची वेळ आली आहे. त्याने संघाबाहेर काढण्याआधी सन्मानाने निवृत्ती घ्यायला हवी.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार गावस्कर म्हणाले, ‘कोणालाही माहित नाही की धोनीच्या मनात काय चालले आहे. त्याने भारतीय क्रिकेटमधील भविष्य केवळ तोच स्पष्ट करु शकतो. पण मला वाटते तो आता 38 वर्षांचा आहे. त्यामुळे आता भारताने त्याच्यापुढचा विचार करायला हवा. कारण पुढील टी20 विश्वचषकापर्यंत तो 39 वर्षांचा होईल.’
गावस्कर पुढे म्हणाले, ‘त्याचे संघात असणे नेहमीच महत्त्वाचे आहे. तो केवळ फक्त धावा करत नाही. तर तो चांगले स्टपिंगही करतो. पण एवढेच नाही तर त्याची मैदानावरील उपस्थिती कर्णधाराला शांत करते. तसेच त्याच्याकडून कर्णधाराला चांगल्या कल्पनाही मिळतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मला असे वाटते वेळ आली आहे.’
‘प्रत्येकाची एक योग्य वेळ असते. मी धोनीचा खूप सन्मान करतो आणि लाखो चाहत्यांप्रमाणे मी सुद्धा त्याचा एक चाहता आहे. मला वाटते की त्याने त्याला संघाबाहेर काढण्यापूर्वीच सन्मानाने स्वत:च बाहेर जायला हवे.’