मागणी घटल्याने पारले कंपनीला आर्थिक फटका

देशातील सर्वात मोठ्या बिस्कीट उत्पादन पारले या कंपनीला आर्थिक मंदीचा सर्वात मोठा फटका बसला आहे. मागणीत झालेल्या घसरणीमुळे येत्या काळात आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्‍यात येणार आहेत तसे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.

कंपनीच्या बिस्कीट विक्रीमध्ये प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे उत्पादनही कमी करावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचारीकपात करण्याची कंपनीवर वेळ येऊ शकते, असे पारले प्रोडक्‍ट्‌सचे कॅटेगरी प्रमुख मयंक शहा यांनी सांगितले. तसेच 100 रुपये प्रति किलो किंवा त्याहून कमी किंमत असलेल्या बिस्किटांवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे.

ही बिस्किटे सामान्यत: 5 रुपये किंवा त्याहून कमी किमतीच्या पाकिटांमध्ये विकली जातात. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही, तर कंपनीच्या कारखान्यांमधील 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय उरणार नाही, असे शहा म्हणाले.

घसरलेल्या मागणीबाबत बिस्किटे व डेअरी उत्पादनांची मोठी कंपनी असलेल्या ब्रिटानियानेही चिंता व्यक्त केली आहे. अगदी 5 रुपये किमतीची उत्पादने विकत घेतानाही ग्राहक दोन वेळा विचार करत आहेत, ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी सांगितले.


Find Out More:

Related Articles: