‘शेव्हरोलेट’ची ‘एसयूव्ही ट्रेलब्लेझर’ बाजारात दाखल
नवी मुंबई: दीर्घकाळच्या प्रतीक्षेनंतर ‘शेव्हरोलेट’ने आपली ‘एसयूव्ही ट्रेलब्लेझर’ ही नवी आलिशान गाडी भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. या गाडीची किंमत २६ लाख ४० हजार रुपये असून ‘ट्रेलब्लेझर’ने ‘शेव्हरोलेट’च्या ‘कॅप्टिव्हा’ची जागा घेतली आहे.
कंपनीच्या ‘कोलोरॅडो’ या पिक अप ट्रकच्या चासीवर बनविण्यात आलेली ‘ट्रेलब्लेझर’ दिल्ली ऑटोएक्स्पो २०१२ मध्ये सादर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर टी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होण्यासाठी तब्बल३ वर्ष वाट पहावी लागली.
‘ट्रेलब्लेझर’मध्ये २.८ लीटर, ४ सिलेंडरचे; १९७ बीएचपी, ५०० एनएम क्षमतेचे डिझेल इंजिन बसविण्यात आले आहे. या गाडीला ६ स्पीडची स्वयंचलित गिअरबॉक्स बसविण्यात आली आहे. ‘ट्रेलब्लेझर’ला टोयोटा फोर्च्युनर, फोर्ड एंडेव्हर आणि ह्युंदाई सांटा फी या गाड्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. ‘ट्रेलब्लेझर’ प्रतिलिटर ११.४५ किलोमीटरचे मायलेज देईल; असा कंपनीचा दावा आहे. या गाडीसाठी अमेझॉनवरही नोंदणी करता येणार आहे.