जुमला

Narayana Molleti

तुमच्या सारखीच सकाळी उठल्या उठल्या मला मोबाईल चेक करायची सवय आहे. व्हॉट्सॲपवर आलेले गुड मॉर्निंग व उपदेशपर मेसेज, फेसबुकवर आलेले कोणाचे वाढदिवसाचे फोटो त्याला लाईक करणे इत्यादी महत्वाची कामे करतांना एक तास कसा निघून जातो हेच कळत नाही.


तर असेच सकाळी मेसेज चेक करीत असतांना एका मेसेजने माझी झोपच उडाली, तुमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज मला इंग्रजीत आला होता वाटले आपण झोपेतच आहोत की काय, म्हणून पुन्हा स्वतःला चिमटा काढला अंग दुखल्यावर मी जागाच असल्याची खात्री पटली. बायकोने भाजी आणायला सांगितल्याने भाजी आणावयास गेलो भाजीवालीला भाजीचा भाव विचारला तर काही पण घ्या चाळीस रुपये पावशेर असे सांगितले म्हटले काही कमी करा तर घ्यायची असली तर घ्या नाही तर घेऊ नका मला काही आता भाजी विकायची गरज नाही कारण माझ्या खात्यात पंधरा  लाख जमा झालेत असे तिने सांगितल्याने मी थोडीफार भाजी घेऊन घरी आलो पटकन आवरून मी आनंदात ऑफिसला जाण्यासाठी निघालो.


 स्टँडवर लगेच एसटीपण मिळाली कंडक्टरला तिकिटाचे पैसे दिले सुट्टे पैसे माघारी मागितले तर चक्क माझ्याकडे सुट्टे नाही म्हणाला, मी म्हटले मी तुझी वर तक्रार करील तर त्याने कुठे तक्रार करायची तिथे करा मी काय घाबरत नाही कारण माझ्या खात्यात आता पंधरा लाख रुपये जमा झालेत त्यामुळे मला नोकरीची गरज नसल्याचे सांगितले निमूटपणे मी स्टॉप आल्यावर खाली उतरलो.


एका हॉटेलात चहा घ्यावा म्हटले मालकाला म्हटले एक चहा आणा तर त्याने तुम्हाला येथे येऊन घ्यावा लागेल कारण वेटर सगळे काम सोडून गेलेत कारण विचारले असता, त्यांच्या खात्यात पंधरा लाख जमा झाल्याने त्यांना आता कामाची गरज नसल्याचे त्याने सांगितले कसाबसा चहा संपवून मी ऑफिसला आलो.


 कामाला सुरुवात करणार तोच मला मोठ्या बॉसचे बोलावणे आले मी आत गेलो तर आमचा बॉस साधे मला ‘बसा’ सुद्धा म्हणेना थोड्या वेळाने त्याने माझ्याकडे पाहिले व काय तुमच्या कामात चुका, एक काम सांगितले तर ते सुद्धा तुम्हाला नीट जमत नाही तुमचे लक्ष कुठे असते असे म्हणत मला बोलायला सुरुवात केली. सकाळपासून सगळेच मला माघारी बोलत असल्याने माझा सुद्धा पारा चढला होता, मी साहेबाला म्हटले ‘ओ साहेब जरा तोंड सांभाळून बोला, आता मला पण तुमच्या नोकरीची गरज नाही हा घ्या माझा राजीनामा चाललो मी घरी’ असे म्हणत तिथल्या तिथे माझा राजीनामा लिहून बॉस मला थांबा, थांबा म्हणत असतांनाही  राजीनामा त्याच्या तोंडावर फेकून तडक ऑफिसच्या बाहेर आलो.


डोक्यात मुंग्या आल्या होत्या, तडक एका बारमध्ये घुसलो थोडी घेतल्यानंतर डोक थोडे शांत झाले बिल देण्याच्या वेळेस ऐटीत मी खिशातून कार्ड काढीत मालकाकडे स्वाईप करायला दिले त्याने स्वाईपकरून त्यावर नंबर टाका म्हटले मी पीन नंबर टाकला पण कमी बॅलन्स असल्याचे कारण सांगत बिल काही पेड होत नव्हते म्हटले घेतल्यामुळे पीन नंबर चुकत असेल म्हणून दोन तीन वेळा पीन नंबर टाकला मात्र बिल काही जमा होईना शेवटी खिशातील होते नव्हते तेवढे पैसे देऊन बँकेत जाब विचारायला गेलो तर बँकेत तोबा गर्दी होती गर्दीत मी कसेबसे क्लार्कला माझ्या पंधरा लाखाच्या मेसेज बाबत विचारले असता त्याने शांतपणे त्याच्या पाठीमागे लिहलेली सूचना मला वाचायला सांगितली त्यावर पंधरा लाख तुमच्या खात्यावर जमा झाले असा कुठलाही मेसेज बँकेने पाठवला नाही चुकीच्या मेसेजला बळी पडू नका असे स्पष्टपणे लिहले होते. माझी खाडकन उतरली होती नोकरीपण गेली आणि पंधरा लाखपण गेले अशी माझी अवस्था झाल्याने तेलही गेले आणि तूपही गेले हाती धुपाटणे आले या म्हणीप्रमाणे माझी अवस्था झाली होती.


Find Out More:

Related Articles: