टी-२० मालिकेसाठी धवनच्या जागी संजूला संधी

Thote Shubham

 येत्या ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली असून या मालिकेतून भारताचा सलामीवीर शिखर धवन याला डच्चू देण्यात आला आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला त्याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

 

सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे शिखर धवन हा हैराण आहे. त्याच्या डाव्या गुडघ्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात झेल पकडताना दुखापत झाली आहे. तब्बल २० टाके त्याच्या गुडघ्याला घालावे लागले आहेत. मंगळवारी त्याची फिटनेस टेस्ट बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने केली. धवन पूर्ण बरा होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले. त्याला टी-२० मालिकेतून वगळण्याचा निर्णय डॉक्टरांच्या अहवालानंतर घेण्यात आला.

 

संजू सॅमसनला धवनच्या जागी संधी देण्यात आली आहे. बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेतही संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. पण त्याला अंतिम संघात स्थान मिळू शकले नव्हते. भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली होती.

 

भारत व वेस्ट इंडिजमध्ये पुढील महिन्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. यातील पहिला सामना ६ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुवअनंतपुरममध्ये तर, अखेरचा सामना ११ डिसेंबरला मुंबईत खेळवला जाणार आहे.

 

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन.

Find Out More:

Related Articles: