बांगलादेशला झटका, शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी
बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसनवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आहे. बांगलादेशचा स्टार खेळाडू असलेल्या शाकिबने मॅच फिक्सिंगबद्दलची माहिती लपवून ठेवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या दौऱ्याआधी बांगलादेश संघासाठी हा मोठा झटका आहे. बांगलादेश भारतीय दौऱ्यावर 3 टी20 आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
शाकिब अल हसनवर लावण्यात आलेल्या 2 वर्षांच्या बंदीमध्ये 1 वर्षांच्या निलंबनाचा समावेश आहे. त्याने आयसीसीच्या एंटी करप्शन नियमांचे भंग केल्याचे तीन आरोप स्विकारले आहेत.
दोन वर्षांपुर्वी शाकिबला सट्टेबाजांकडून मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाली होती, मात्र शाकिबने याची माहिती आयसीसीला दिली नाही. काही दिवसांपुर्वीच शाकिबने आयसीसीच्या अधिकाऱ्यांसमोर ही गोष्ट मान्य केली.
शाकिबवर बुकींद्वारे करण्यात आलेला संपर्क लपवण्याचा आरोप आहे. त्याने बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात 2018 मध्ये झालेल्या त्रिकोणी मालिका आणि आयपीएल 2018 मध्ये सट्टेबाजांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्याने ही माहिती आयसीसीला दिली नाही.
32 वर्षीय शाकिब या प्रकरणावर म्हणाला की, मला दुःख आहे की, ज्या खेळावर मी प्रेम करतो, त्याच्यावरच बंदी घालण्यात आली आहे. मात्र आयसीसीला मॅच फिक्सिंगच्या ऑफर आल्या होत्या, हे न सांगितल्याची गोष्ट मी स्विकारतो.
शाकिब पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये देखील खेळू शकणार नाही. तसेच, ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये देखील त्याला सहभागी होता येणार नाही.