Corona | घरीच थांबा, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारा - अजित पवार
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचं आयोजन करुन सामुहिक पद्धतीनं करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातीलं, परंतू शोभायात्रांचं आयोजन आणि सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं. नागरिकांनी यंदा ‘कोरोना’विरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीला नागरिकही मोठा प्रतिसाद देत आहेत. मात्र, उद्या 25 मार्चला गुढीपाडवा मराठी नववर्ष आहे. कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा हा नागरिकांना सामुहिकरित्या साजरा करता येणार नाही. मात्र, हा उत्साह राखून ठेवा, देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करु, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.