शिवसेनेत हिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी – चंद्रकांत पाटील
‘दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमत मिळविल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आनंद व्यक्त करणे म्हणजे शेजारच्या घरात मुलगा जन्माला आला म्हणून आपण स्वत: पेढे वाटण्यासारखे आहे, अशी उपरोधिक टीका करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
बुधवारी दुपारी एका खासगी कार्यक्रमासाठी पाटील सोलापुरात आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘शिवसेनेत खरी हिंमत असेल तर स्वबळावर एखादी निवडणूक राज्यात लढवून दाखवावी,’ असं आवाहन पाटील यांनी शिवसेनेला केलं आहे.
तसेच ‘राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वरचेवर वाढत चालले असताना मुंबईत एका कुटुंबाला वाटते म्हणून ‘नाईट लाईफ’ची संकल्पना कृतीत येत आहे. परंतु ‘नाईट लाईफ’मुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून जाण्याचा धोका संभवतो,’ असेही मत पाटील यांनी व्यक्त केले
दरम्यान, ‘अरे तुम्ही किती दिवस राहणार आहात… तुमचे बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात. पण त्यासाठी तुम्ही किती खर्च कराल. टेंडरपण अजून काढलं नाही. उधळपट्टी चालू आहे. तसेच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त ताटात ओढण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशा शब्दात पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपण लोकांचे सेवक आहोत त्यामुळे आपण कमीत कमी सुविधा घ्यायला हवी. मी पाच वर्षात माझ्या बंगल्याचा रंगही बदलला नाही. मात्र, आज तुम्ही आज बंगल्याचं सर्व चित्र बदलत आहात. या सरकारची नुसती उधळपट्टी सुरु असल्याची टीका त्यांनी केली.