शिवरायांचा राजकारणासाठी चुकीचा वापर - संजय राऊत
दिल्ली निवडणुकीत ‘तान्हाजी’ सिनेमाचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा देखील राऊतांनी यावेळी बोलताना दिला. ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी चुकीचा वापर केला जात आहे,’ असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या वंशांनी काय भूमिका घ्यावी असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी उत्तर देणे टाळले.
‘ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे व त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे आता काय प्रतिक्रिया देतात, ते मला पाहायचे आहे, असे राऊत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘संभाजी भिडे तसेच भाजप यांनी या चित्रफितवर प्रतिक्रिया दिल्यावर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. इतक्या जणांना ही चित्रफित पाठवल्यानंतरही कुणाचीही एका ओळीचीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या,’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान, दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवण्यात आले आहे. याच प्रमाणे नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे.