संघ देशातील 130 कोटी जनतेला हिंदूच मानतो – मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, संघ भारताच्या सर्व 130 कोटी जनतेला हिंदू समाजच मानतो. मग ते कोणत्याही धर्माचे अथवा संस्कृतीचे असो. धर्म आणि संस्कृतीकडे लक्ष न देता जे लोक राष्ट्रवादाची भावना ठेवतात आणि भारताची संस्कृती व त्याच्या विरासतीचा सन्मान करतात, ते हिंदू आहेत. संघ देशाच्या सर्व 130 कोटी लोकांना हिंदू मानतो.
ते म्हणाले की, संपुर्ण समाज आमचा आहे व संघाचा उद्देश संघटित समाजाचे निर्माण करणे हे आहे. भारतमाते पुत्र मग तो कोणतीही भाषा बोलत असेल, तो कोणत्याही क्षेत्रातील असो, कोणत्याही स्वरूपात पूजा करत असेल अथवा कोणत्याही पूजेवर विश्वास ठेवत नसेल, तो एक हिंदू आहे.
मोहन भागवत म्हणाले की, संघ सर्वांचा स्विकार करतो. त्यांच्याबद्दल चांगला विचार करतो आणि त्यांच्या प्रगतीसाठी उच्च स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. ते तेलंगाणाच्या संघाच्या सदस्यांकडून आयोजित तीन दिवसीय संकल्प शिबिरात उपस्थित लोकांना संबोधित करत होते.
रविंद्र नाथ टागोर यांच्या एका निंबधाचा उल्लेख करत भागवत म्हणाले की, इंग्रजांना वाटते की भारतात काहींना हिंदू म्हटले जाते व काहींना मुस्लिम. ते आपआपसात भांडून संपून जातील. मात्र इंग्रजांना लक्षात ठेवा असे कधीच होणार नाही. अशा संघर्षातूनच समाज उपाय शोधून काढेल.
ते पुढे म्हणाले की, प्रचलित भाषेत, विविधतेत एकता आहे असे म्हटले जाते. मात्र आपला देश एक पाऊल पुढे आहे. विविधतेत एकता नाही तर एकताच विविधता आहे. आम्ही विविधतेत एकता शोधत नसून, आम्ही विविधता ज्या एकतेतून निघाली आहे ती एकता शोधत आहोत.