
पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरून भाजप गायब
बीड : फेसबुकवर भावनिक आवाहन केल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटर अकाऊंटवरून भाजप हे शब्दच काढून टाकले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच भाजपवर नाराज आहेत का या चर्चांना उधाण आलंय. फेसबुकवरील कालच्या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी आपण १२ डिसेंबरला गोपीनाथगडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं होतं. आता त्या १२ डिसेंबरला कोणती भूमिका जाहीर करतात का याकडे लक्ष लागलंय.
परळी मतदार संघातून पराजय झाल्यानंतर पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या प्रश्नांवर थोडा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ हवा आहे. याकरता आपण आठ ते दहा दिवस कुणाशीही संपर्क साधणार नाही, असं पंकजा मुंडे त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या.
१२ डिसेंबर रोजी भाजप दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या दिवशी आपण मनसोक्त बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा नेमका अर्थ काय? १२ डिसेंबरला पंकजा मुंडे वेगळा निर्णय सगळ्यांसमोर मांडणार आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
परळी मतदार संघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडून पराभव झाला. त्यावेळी पंकजा मुंडेंनी 'लोकांनी माझा स्वीकार केला नाही' यावर भर देत आपला पराभव स्वीकारला. मी हा पराभव स्वीकारते, पुढे या पराभवाची समीक्षा आपण करु असं म्हणत मताधिक्य मिळालेल्यांनाही विजय अनाकलनीय आहे ही बाब पंकजा यांनी अधोरेखित केली. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या मात्र या सगळ्यात पंकजा मुंडे कुठेच नव्हत्या. अखेर फेसबुक पोस्ट लिहून पंकजा मुंडे यांनी आपण काही काळाकरता अलिप्त राहणार असल्याचं म्हटलं आहे.