संसदीय सल्लागार समितीमधून प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी
भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभेत नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार चांगलाच महागात पडला आहे. ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत विरोधकांनी बुधवारी भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर भाजपने प्रज्ञा यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारने त्यांची वादग्रस्त वक्तव्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
प्रज्ञा यांचे वक्तव्य दूर्देवी असून संसदेचा कार्यकाळादरम्यान असे वक्तव्य करणे निंदनिय असल्याचे मत भाजपचे संसदेमधील कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नोंदवले. तसेच संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधूनही प्रज्ञा यांना काढून टाकण्यात येणार असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले. प्रज्ञा यांना या निर्णयामुळे समितीच्या कोणत्याच बैठकीला उपस्थित राहता येणार नाही.
ही समिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आली होती. या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. विरोधी पक्षातील खासदारांपैकी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.
सध्या ‘विशेष संरक्षण गट’ (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. ‘डीएमके’चे खासदार ए. राजा यांनी या चर्चेदरम्यान गांधी हत्येचे उदाहरण दिले. गोडसे याने विशेष सुरक्षेअभावी कशाप्रकारे गांधी हत्या केली, हे राजा यांनी सभागृहात सांगितले. पण, त्यांना रोखत तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये, असे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी बजावले. पण, प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त करीत भाजप सरकारचा निषेध नोंदविला.
ए. राजा यांनी यावेळी केवळ राजकीय कारणांसाठी एसपीजी सुरक्षा ही नको, तर ही सुरक्षा संबंधित व्यक्तीला असलेला धोका ओळखून देण्यात यावी. त्यामुळे केवळ पंतप्रधान पद भूषविलेल्या व्यक्ती वगळता इतरांना एसपीजी सुरक्षा नाकारण्याच्या विधेयकावर गृहमंत्रालयाने फेरविचार करावा, अशी मागणीही केली.